📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

क्षयरुग्णांच्या सहवासातील व्यक्तींसाठी 'सी.वाय- टी.बी राज्यभर चाचणीस सुरुवात : विनाकारण औषधे घेण्याची गरज नाही : रविंद्र जाधव

मालेगाव (वार्ताहर) - क्षयरुग्णांच्या कुटुंबीयांना भविष्यात क्षयरोग होण्याची शक्यता आहे का? है पाहण्यासाठी क्षयरोग विभागाने नवीनच 'सीवाय-टीबी' ही चाचणी सुरू केली आहे. सदर चाचणी मोहिमेचे उद्दघाटन हे मनपा मा.आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांच्या हस्ते कॅम्प नागरी आरोग्य केंद्र येथे करण्यात आले.सदर उद्दघाटना प्रसंगी मनपाचे महिला व बालविकास अधिकारी तथा उपायुक्त मा.श्रीमती पल्लवी शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.ही चाचणी जर सकारात्मक आली, तरच त्यांना क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येतात. अन्यथा त्यांना विनाकारण औषधे घेण्याची गरज पडत नाही. 
             फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने एखाद्या रुग्णाचे निदान झाल्यास त्या रुग्णाच्या घरातील इतर सदस्यांनाही क्षयरोग होण्याची दाट शक्यता असते.म्हणून याआधी नवीन क्षयरोगी (फुप्फुसाचा) रुग्णाचे निदान झाले की, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना त्याची लक्षणे आहेत का, हे पाहून जर लक्षणे असतील, (दोन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला, वजन कमी होणे, हलकासा ताप,भुक मंदावणे) तर त्यांची क्षयरोगाची चाचणी करून औषध उपचार देतात. परंतु, बहुतांशवेळा काही सदस्यांना क्षयरोगाची लागण झालेली असते,मात्र त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना क्षयरोगाची लक्षणे दिसत नाहीत, त्याला सुप्तावस्थेतील क्षयरोग (Latent TB) असे म्हणतात. म्हणून पुढे त्यांनाही सक्रिय क्षयरोग होऊ शकतो.हा सुप्तावस्थेतील क्षयरोग आहे का, हे पाहण्यासाठी आधी कोणतीच चाचणी नव्हती.
             दरम्यान, क्षयरोग विभागाने आता त्यासाठी ऑक्टोबरपासून 'सी.वाय-टी.बी.' ही चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी नवीन क्षयरोगी रुग्णाच्या संपर्कातील व क्षयरुग्णांच्या जवळील सहवासात येणा-या संपर्कातील व्यक्तींसाठी करता येते.ती सकारात्मक आली, तरच त्यांना प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधांचा डोस सुरू करण्यात येतो. तो आठवड्यातून एकदा असे बारा डोस घ्यावे लागतात. जर चाचणी नकारात्मक आली, तर त्यांना कोणतेही औषधे घेण्याची गरज पडत नाही.म्हणून आता त्यांना पूर्वीसारखी सरसकट औषधे घेण्याची गरज नाही. 
                केंद्र सरकारचे २०२५ पर्यत भारतातुन क्षयरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असुन त्याकरिता नागरीकांनी क्षयरोगाचे लक्षणे आढळल्यास तात्काळ मनपा संचलित आरोग्य केंद्र,दवाखाने किंवा शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेण्याचा सल्ला मनपाचे आरोग्याधिकारी डॉ.जयश्री आहेर यांनी दिला. सदर चाचणी मोहिम यशस्वी करणे करिता शहर क्षयरोग अधिकारी डॉ.ऋषिकेश साळुंके व आर.सी.एच अधिकारी डॉ.अलका भावसार यांनी संयुक्त रित्या नियोजन केले आहे.

*काय आहे 'सीवाय-टी.बी.' चाचणी ?*
 'सीवाय-टी.बी.हे औषध पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केले आहे. फुप्फुसाचा क्षयरोग झालेल्या रुग्णांच्या सहवासातील १८ वर्षांपुढील नागरिकांवर त्याचे ०.१ मिली औषध इंजेक्शनद्वारे डाव्या हातावरील त्वचेच्या खाली टोचले जाते.टोचलेल्या जागेची ४८ तासानंतर तपासणी केली जाते. तेथे जर त्वचेला गाठी उठल्यास त्याचे प्रमाण किती आहे, ते पाहूनच त्यांना क्षयरोग प्रतिबंधात्मक डोस सुरू केला जातो.हा डोस प्रतिबंधात्मक असून, क्षयरुग्णांच्या औषधांपेक्षा वेगळा असतो.या चाचणीमुळे क्षयरोग होण्या अधिच उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
              तेव्हा क्षयरोग दुरीकरणाचे केंद्र सरकारचे २०२५ पर्यंत चे उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपा हद्दीतील सर्व पात्र नागरीकांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे व क्षयरोग दुरीकरणासाठी आपले योगदान द्यावे,असे आवाहन मा.आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांनी केलेले आहे.
                                          

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने