धुळे शहरातील आझादनगर पोलीस स्टेशनच्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास चाळीस हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे.
आरिफअली सैय्यद युसुफअली सैय्यद, वय-५५, सहा.पोलीस उपनिरीक्षक, आझाद नगर, पोलीस स्टेशन,धुळे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांच्या चुलतभावाचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. मृत व्यक्तीने त्यांच्या हयातीत २ कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेतली होती. परंतू विमा प्रतिनीधीने सदर रक्कम वारसांचे नाव न करता दुसऱ्या व्यक्तीच्या नावे जमा करून फसवणूक केली या प्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याचा तपास आरिफअली सैय्यद याच्याकडे होता. विमा रक्कम वारसांच्या खात्यात जमा करण्यासाठी तपासी अधिकारी सैय्यद याने तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये लाचेची मागणी केली त्यामुळे तक्रारदार यांनी धुळ्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांना भेटून तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरीफ अली सय्यद यांनी तडजोडी अंती 40 हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली. ही रक्कम पारोळा रोडवरील गिंदोडिया चौकातील भाग्यश्री पान कॉर्नर समोर देण्याचे ठरले. त्यानुसार या ठिकाणी उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजीत सिंग चव्हाण, तसेच हेमंत बेंडाळे व रूपाली खांडवी तसेच कर्मचारी राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, यांनी भाग्यश्री पान कॉर्नरच्या जवळ सापळा लावला. यावेळी सय्यद याने पैसे स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे याच लाचखोर पोलीस अधिकाऱ्यास सोनगीर पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना 22 जुलै 2010 रोजी एका प्रकरणात 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्याच्याविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 2013 मध्ये पाच वर्षाची शिक्षा दिली होती. त्यामुळे त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ देखील करण्यात आले होते. यानंतर उच्च न्यायालयाने 2019 मध्ये दिलासा दिल्याने सय्यद पुन्हा पोलीस खात्यात हजर झाला होता.
हे प्रकरण धुळे शहरातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारे आहे. लाच घेताना पोलीस अधिकारी रंगेहात ताब्यात घेण्यात आल्याने नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे.