क्राईम टिम(मालेगाव लाईव्ह न्युज नेटवर्क):
केवळ स्व:तच्या जीवाची मौज करता यावी म्हणून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण, दरोडा, रस्ता लूट व खंडणीसाठी दमबाजी करणाऱ्या सहा जणांना मालेगाव छावणी पोलिसांनी अटक केली आहे. २८ हजाराचा मोबाईल लुटणाऱ्या तरुणांची दिवाळी मजेत गेली. मात्र, दिवाळीनंतरचा उत्तरार्ध त्यांच्यासाठी पोलिस कोठडीची हवा खाणारा ठरला. त्यातच या तरुणांची चार लाख रुपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा कारही जप्त करण्यात आली. अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी संशयितांना जेरबंद केले.
माहिती सविस्तर अशी की, मित्र असलेल्या पाच ते सहा जणांना डोक्यात एखाद्याला गंडविण्याची हुकी आली. त्यातूनच त्यांच्या डोक्यात चोरीचा व लुटीचा बेत आला. परराज्यातील फर्निचर व्यावसायिक असलेल्या एकाचे व्हिझिटींग कार्ड मिळवून त्याला दरवाजा बनवायचे आहेत. माप घेण्यासाठी ये असे सांगून रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील २८ हजार रुपये किंमतीचा सॅमसंगचा मोबाईल लुटण्याचा व पाच लाख रुपये खंडणी मागण्याचा प्रकार गेल्या आठवड्यात झाला. पद्माराम चौधरी (वय २३, रा. दुधवट, ता. राणीवाडा, जि. जालोर, राजस्थान, हल्ली गिरणा स्टिल सोयगाव) या फर्निचर व्यावसायिकाला दरवाजांचे माप घेण्याच्या नावाने बोलावून त्याला इर्टिगामध्ये (एमएच ४१ एएस २९१४) बसवून साईट बघण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून अपहरण करीत बंदुकीचा धाक दाखवून मोबाईल लुटला. तसेच, पाच लाख रुपयांची खंडणी दे अन्यथा मारुन टाकू अशी दमबाजी केली. २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर हा प्रकार घडला. मोबाईलवरुन संबंधितांनी धमकीही दिली. या प्रकारामुळे भेदरलेल्या चौधरी यांनी रविवारी (ता. ७) छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
*छावणी पोलिस स्टेशनची कामगिरी कौतुकासद 24 तासाच्या आत आरोपींच्या आवळ्या मुसक्या*
छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील अहिरे, पोलिस नाईक नितीन बारहाते, मोठाभाऊ जाधव, संजय पाटील, कैलास सोनवणे, विजय घोडेस्वार आदींनी या प्रकरणातील संशयितांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध दरोडा, अपहरण, खंडणी व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीची इर्टिगा व २८ हजाराचा मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. यांनी केली लुटमार गोपिचंद शेलार (वय २२), मंगलदास अहिरे (वय २४), कल्पेश देवरे (वय २१), अमोल बच्छाव (वय ३२, चौघे रा. नगाव), भूषण सोनवणे (वय २६, टेहेरे), प्रशांत उर्फ पिंटु जाधव (वय ३२, श्रीरामनगर, गवळीवाडा) यांनी दरोडा टाकला.
Tags
crime