अहमदनगर | कल्पेश सोनार
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील ‘आयसीयू कोरोना कक्षा'ला आज (शनिवारी) सकाळी 10 च्या सुमारास आग लागली. त्यात कक्षातील सगळ्याच रुग्णांना भाजले आहे. पैकी 10 ते 12 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, जखमींवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
नगरच्या जिल्हा रुग्णालयातील 'आयसीयू' कक्षात 25 जणांवर कोरोनावरील उपचार सुरु होते. आज सकाळी 10च्या सुमारात कक्षाला अचानक आग लागली. झपाट्याने आग पसरल्याने सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यातील सात जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. अन्य भाजलेल्या 20 जणांना तातडीने इतर कक्षांत हलविण्यात आले.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या रुग्णांपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्यातील अंदाजे दहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, याबाबत जिल्हा रुग्णालयाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी हजर झाले.. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.. सोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले.
ही आग इतकी भीषण होती, की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डातील काही रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळाचे फोटो, व्हिडीओ समोर आले असून, त्यामुळे आगीची भीषणता समोर येत आहे.