दिनेश पगारे | मालेगाव लाईव्ह ब्युरो
सुरगाणा शहरात एकाच वेळी दोन शिक्षकांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला असून दुर्गादेवी मंदिराच्या परिसरातील खोकरतळा येथे रहात असलेले नाथ लक्ष्मण देशमुख (शाळा नं.२) व
परशराम धनाजी गांगुर्डे, (शाळा घागबारी) यांच्या खोलीच्या दरवाजाच्या कडी-कोयंडा तोडून रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. गांगुर्डे यांच्या घरातून सहा हजार रुपये रोख, एक अंगठी तर देशमुख यांच्या घरातून साडेतीन हजार रुपये रोख ऐकून साडेनऊ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
तसेच चोरट्यांनी पैसे शोधण्यासाठी कपाटातील कागदपत्रे अस्तव्यस्त करीत सामानाची
नासधुस केली असल्याचे समजते. शिक्षक गांगुर्डे हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तर शेजारीच राहत असलेले देशमुख हे दसरा सणानिमित्त गावाकडील घरी गेले होते, मात्र घरी जातांना कपाटात ठेवलेली पन्नास हजार रुपयांची रक्कम ते सोबत घेऊन गेल्याने ते पैसे सुरक्षित राहिले अन्यथा चोरट्यांनी या रक्कमेवरही चोरट्यांनी डल्ला मारला असता.
याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सहारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सुरगाणा पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.