कल्पेश वैजापूरकर | पुणे ब्युरो
🔴 कबड्डी खेळत असताना कोयत्याने केले वार
🔴 चाकू व कोयत्याने आरोपीने केले तब्बल 44 वार
पुण्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येमुळे सध्या खळबळ माजली आहे. बिबवेवाडी परिसरात कबड्डी खेळत असताना क्षितिजा (वय 14) हिची कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली.
या दुदैवी अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये घडली आहे. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स इथं ही घटना घडली. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा, अप्पर, बिबवेवाडी) असं मृत तरुणीचं नाव आहे
“काल सायंकाळच्या सुमारास मयत मुलगी कबड्डीचा सरावासाठी यश लॉन्स येथील परिसरात गेली होती. तेव्हा मुख्य आरोपीसह चौघे जण दुचाकीवरून तिथे गेले. मुलीस बाजूला घेऊन तिच्यावर कोयत्याने आणि चाकूने वार केले. या घटनेत तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही तासात मुख्य आरोपीसह चौघांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपी मयत मुलीच्या घराशेजारी पाच वर्ष राहत होता. मात्र साधारण वर्षभरापूर्वी दुसरीकडे राहण्यास गेला होता. आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे,” अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे