📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भोंदू बाबाचा चार महिलांवर अनेक वेळा बलात्कार

वसई (जय योगेश पगारे) भारतात अंधश्रध्दाळू लोकांची कमतरता नाही, शिवाय ते इतरांचे ऐकून सुद्धा घेत नाही, नंतर फसवणूक झाल्यावर दाद मागतात, पण तो पर्यंत त्यांचे अतोनात नुकसान झालेले असते, असाच एक धक्कादायक प्रकार वसई येथे उघडकीस आला असून, भोंदू बाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एक नाही तर चार चार महिलांवर बलात्कार केला आहे, 
या  महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदू बाबाला विरार मधील अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यत फसवणूक झालेल्या ४ अत्याचारित महिला पुढे आल्या आहेत. यातील दोन पीडित महिला या मुकबधीर आहेत.

विरार मध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेला आर्थिक अडचण भेडसावत होती. जुलै महिन्यात तिच्या परिचयाच्या दिनेश देवरुखकर या व्यक्तीने तिला मॅथ्यू पंडियन या बाबाची माहिती दिली. हा बाबा मंत्र आणि पूजा करून आर्थिक अडचण दूर करतो, असे देवरुखकर याने पीडित महिलेला पटवून दिले होते. त्याला बळी पडून पीडित महिला विरार येथे बाबा राहत असलेल्या एका घरात गेली. पूजेसाठी पंडियन याने तिच्याकडून १० हजार रुपये घेतले.

पूजेनंतर कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडेल असे त्याने पीडित महिलेला सांगितले होते. त्यानंतर पूजेच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. असाच प्रकार त्याने पीडित महिलेच्या अन्य ३ मैत्रिणींसोबत केला. त्यांच्याकडूनही पैसे घेऊन त्यांच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी कुठे वाच्यता केली तर जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन, अशी धमकीही दिली होती. जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यात बाबाने अनेक वेळा या महिलांवर अत्याचार केल्याचे पीडित महिलेच्या पतीने सांगितले.

फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या चारही पीडित महिलांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारी वरून पोलिसांनी दिनेश देवरुखकर तसेच भोंदू बाबा मॅथ्यू पंडियन याच्या विरोधात बलात्कारासह महाराष्ट्र नरबळी, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादू टोणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. या बाबाने अनेक महिलांची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केल्याचा अंदाज असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पैशांचा पाऊस पाडून २६० कोटी रुपये मिळवून देणारा असल्याचा दावा या बाबाने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान अशा प्रकारची फसवणूक होण्याचे प्रमाण कमी नाही, फसवणूक झाल्यावर हे लोक या अशा अंधश्रद्धेपोटी तक्रार करायला सुद्धा घाबरतात परंतु अशा लोकांमुळे इतरांचीही फसवणूक होत असते या गोष्टींना आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी सुज्ञ राहणे वेळीच तक्रार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

जगात भूत-प्रेत जादू टोना असं काहीच नाही
जगात अनेक लोक मानत असले तरी अद्याप पर्यंत कुठलाही ठोस पुरावा कोणीही उपलब्ध करू शकले नाही त्यामुळे जगात जादूटोणा भूत प्रेत किंवा काळी जादू वगैरे असा कुठलाही प्रकार नाही त्यामुळे नागरिकांनी अशा भूलथापांना बळी न पडता स्वतःची फसवणूक करून घेऊ नये व घाबरून ही  जाऊ नये..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने