प्रशांत गिरासे | नाशिक प्रतिनिधी
सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावरील अजिंक्य तारा हॉटेलजवळील एक्सेस बँकचे एटीएम अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील अंदाजे 22 लाख रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की एटीएमचा काचेचा दरवाजा उघडून चोरटा आत शिरताच त्याने पकडीच्या सहाय्याने सिसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर्स तोडल्या. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने मशीनचा भाग फोडून आतील अंदाजे 22 लाख रुपये घेऊन फरार झाल्याचे समजते. चोरट्याने जातांना शटर खाली ओढून घेतलेले असल्याने दिवसभर कोणी एटीएम गेले नसल्यामुळे चोरीचा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही.
आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान चोरीचा प्रकार उघडकीस येताच जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर अधिक्षक माधुरी केदार-कांगणे, उपअधिक्षक भाऊसाहेब तांबे, निरीक्षक संतोष मुटकूळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखा व ठसे तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी पोहचले होते. बँकेचे व्यवस्थापक उशीरापर्यंत पोहचले नसल्याने चोरी गेलेल्या रकमेचा निश्चित आकडा समजू शकला नाही.