श्रीनगर : दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद (टेरर फंडिंग) पुरविली जात असल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवार, दि. ८ ऑगस्ट रोजी छापेमारीचा धडाका लावला.टेरर फंडिंग प्रकरणी एनआयए अधिकार्यांच्या पथकांनी रविवारी जम्मू-कश्मीरच्या १४ जिल्ह्यांमध्ये सुमारे ४५ ठिकाणी छापेमारी केली.
यामध्ये जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर, पुलवामा, कुपवाडा, डोडा, किश्तवाड, रामबन, अनंतनाग, बडगाम, राजौरी आणि शोपियान या जिल्ह्यांमध्ये एनआयएने छापेमारी केल्याने अनेकांचे धाबे दणाणल्याचे चित्र होते. एनआयएने जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासोबत (सीआरपीएफ) मिळून काश्मिरातील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. यादरम्यान काश्मिरातील अनेक संघटनांची चौकशी करण्यात आली. यावेळी ‘जमात-ए-इस्लाम’ संघटनेतील सदस्यांच्या घरांचीही झाडा-झडती घेण्यात आली. पाकिस्तानचे समर्थन आणि फूटीरतावादी धोरणांमुळे २०१९ साली केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली होती. मात्र एनआयएच्या छापेमारीमुळे असे असूनही ही संघटना जम्मू -काश्मीरमध्ये कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले.
१० जुलै रोजी एनआयएने जम्मू -काश्मीरमध्ये ६ लोकांना टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. तर ९ जुलै रोजी जम्मू -काश्मीर सरकारच्या ११ कर्मचार्यांना दहशतवादी संबंध असल्याच्या कारणावरून नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. यामधील दोन आरोपी हे हिजबुल-मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनचे मुलं असल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.
(Mahamtb)