नवी दिल्ली : लस घेतली तरीही कोरोना होतो या बातमीमुळे हैराण झालेल्यांसाठी आणि 'एस्ट्राजेनेका'च्या 'कोविशिल्ड' या लसीची मात्रा घेणाऱ्या एक चांगली बातमी आहे. देशातील १५.९ लाखांहून जास्त आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, कोविशिल्डच्या दोन्ही मात्रांनंतर कोरोना लागण होण्याचा वेग हा ९३ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोविशिल्डची लस घेणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
'ब्रेक-थ्रू इन्फेक्शन'च्या सर्वात मोठ्या अभ्यासानुसार, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याचा दर हा १.६ टक्के इतका आहे. म्हणजे एक हजार लसीकरण झालेल्या व्यक्तींपैकी १६ जणांना कोरोनाची लागण होऊ शकते. कुठल्याही व्यक्तीने जर लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या दोन आठवड्यानंतर त्याला पूर्णपणे लसीकरण झाल्याचे मानले जाते. ब्रेक थ्रू इन्फेक्शनच्या दराचा अंदाज व्यक्त करणारा एक अहवाल चंदीगढच्या पीजीआयतर्फे 'न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये (The New England journal) प्रसिद्ध झाला आहे. कोवशील्ड, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या AZD-1222 फॉर्म्यूलेशनच्या भारतीय बनावटीची ही लस आहे. कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढाईतील लसीकरण मोहिमेत प्रामुख्याने ही लस वापरली जात आहे.