मालेगाव (जय योगेश पगारे) १३ ऑगस्ट.
कौन कहता है पहली नजर में इश्क नहीं होता?वतन से किया था आज तक निभा रहा हूं।
एरवी चौकाचौकात शहर विद्रुपीकरण करणारे आणि त्यात भाई, डॉन, साहेब, जिगर, जान, दादा, अण्णा शेठ असे बॅनर्स आपण नेहमीच बघत असतो आणि बऱ्याचदा तोंडातून शिव्याही निघत असतात, पण आज मात्र एक बॅनर बघून आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला देशप्रेम मिरवत फिरणारे तथाकथित देशभक्त व्हाट्सअप, फेसबुकवर आपली देशभक्ती प्रसारित करीत असतात व इतर वेळी रस्त्यावर पडलेला तिरंगा बघून त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतात.
पण गेल्या दोन दिवसापासून मालेगाव शहरात प्रत्येक चौकात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा बॅनर दिसत आहे ज्यामध्ये तुमचा आमचा सर्वांचाच सण असलेला स्वातंत्र्यदिन म्हणजेच 15 ऑगस्ट हा 'आमचा' सण म्हणून शुभेच्छा देणारं बॅनर आपण पहिल्यांदाच बघत आहोत.
मालेगाव शहरासह तालुक्यातील देशाच्या सीमेवर भारतीय नागरिकांच्या रक्षणासाठी पहारा देणारे आपले लाडके सैनिक आपणा सर्वांना 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे!
आर्मी आणि जवान म्हटले की प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये त्यांच्या प्रती आदर, प्रेम असते आणि त्यांचे त्याग, बलिदान, शौर्य आठवताच आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, आपल्या पराक्रमाने, शौर्याने आपल्या देशाचे रक्षण करीत वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्यास मागेपुढे न बघणाऱ्या अशा या सैनिकांचा अर्थात आपल्या ह्या खऱ्या हिरों साठीचा असा उपक्रम पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही,
मालेगाव तालुक्यातील सध्या सीमेवर कार्यरत असणाऱ्या सर्व जवानांकडून स्वातंत्र्य दिनाच्या अशा शुभेच्छा पाहून प्रत्येक भारतीयांचा उर अभिमानाने भरून येतो देशप्रेमाचा असा एक आगळा-वेगळा उपक्रम पाहून या सैनिकांबद्दलचा आदर द्विगुणित झाला आहे
शहिद भगतसिंग सेना मालेगाव कॅम्प तर्फे शहर व तालुक्यातील सध्या सेनेत कार्यरत असणाऱ्या जवानांचा सन्मान तसेच राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे, ज्यामध्ये मालेगावातल्या प्रमुख चौकांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी अशा प्रकारचे बॅनर्स लागलेले दिसत आहेत.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता लॉकडाऊन मुळे सहा महिने सीमेवर अडकलेल्या तसेच त्यानंतरच्या सहा महिने चीनने केलेल्या घुसखोरी नंतर तेथे अडकलेल्या सैनिकांच्या परिवाराकडे लक्ष देण्यासाठी सैनिकांच्या सुट्टीवर आलेल्या मित्रांनी अनेक उपक्रम राबविले, अनेक आबालवृद्धांची मदत केली, काही सैनिकांच्या घरी त्यांच्या परिवारातील सदस्यांची लग्न, दवाखाना व इतर संदर्भातील कामे सुट्टीवर असलेल्या जवानांनी केली, त्यामुळे जरी आपला मुलगा, पती, भाऊ सीमेवर असला तरी त्यांचा प्रतिनिधी अथवा प्रतिबिंब समजून त्यांची मदत करणाऱ्या जवानांना आपला मुलगा, भाऊ मानत तो आपली मदत करतो आहे ते बघून प्रत्येक परिवारातील सदस्यांच्या डोळ्यात पाणी येत होते, अर्थातच एवढे अतोनात प्रेम हे सैनिकांच्या परिवारातील व्यक्तीच करू शकतात याचे उदाहरणच दाखवून दिले.
भारतीय जनता आपल्या परिवारानंतर सर्वात जास्त जर प्रेम कोणावर करत असेल तर ती या देशावर आणि देशातील आपल्या सैनिकांवर करत असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही, जगाच्या पाठीवर कुठेही एखादा सैनिक शहीद झाला तरी त्याच्याबद्दल एवढे प्रेम कोणत्याच देशात दिसून येत नाही जेवढे भारतात आहे, अर्थातच आमच्यासाठी सीमेवर आपल्या प्राणांची आहुती देऊ शकतो त्याच्यासाठी आमच्या मनात प्रेम आदर आणि भावना आहेतच आणि त्या तशाच अबाधित राहतील अशी भावना नागरिक व्यक्त करीत असतात.
या सर्व सैनिकांना एकत्रित करण्याचे काम शहीद भगतसिंग सेनेच्या पुढाकाराने झाले, व काही सैनिकांशी आम्ही संवाद साधला असता, त्यांच्या मनातील भारतीय नागरिकांप्रती असलेल्या संवेदना बघून हृदय भरून आले, सीमेवर पहारा देत असताना देशांतर्गत सुद्धा कोणत्याही नागरिकाला आमची गरज भासली ती सुद्धा आम्ही करू आणि याचेच उदाहरण म्हणून जे जे सैनिक सुट्टीवर येतील ते त्यांच्या परीने त्यांच्या गावातील नागरिकांची मदत करतील असे आमच्या ग्रुपने ठरवले आहे.
एमएच 41 आर्मी ग्रुप नावाने त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी तसेच विचार विनिमय करण्यासाठी एक मंच तयार केला आहे, त्याद्वारे विचारांची देवाण-घेवाण व गरज पडल्यास मदतीसाठी
जो सैनिक सुट्टीवर आला असेल त्यांच्याद्वारे मदत पोहोचविण्याचे काम यापुढे करण्यात येईल आणि असे शिस्तबद्ध व अतुलनीय काम या सैनिकांतर्फे करण्यात येणार आहे, यामुळे सहाजिकच या सैनिकांबद्दलचा आदर आणि प्रेम प्रत्येक मालेगावकराच्या मनात वाढून त्यांच्या या कामात सहभागी होण्याचे सौभाग्य आपणासही लाभावे अशी विनंती करीत असेल !
जय हिंद!