*: उपविभागीय दंडाधिकारी डॉ.शर्मा*
*मालेगाव, दि. 27 (उमाका वृत्तसेवा)*: मालेगाव शहरातील दोन आरोपींचे हद्दपारिचे आदेश निर्गमित केल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी दिली आहे. कायदा हातात घेवून लोकांचे शरीराचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करुन अशा आरोपींच्या दहशतीमुळे तो राहत असलेल्या भागात कोणीही व्यक्ती त्यांचे विरुध्द उघडपणे साक्ष देण्यास पुढे येत नाही. अशा हद्दपार केलेल्या आरोपींवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार असून कायदा हातात घेणाऱ्या आरोपींची यापुढे गय केली जाणार नसल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
पोलीस निरीक्षक आयशानगर पोलीस ठाणे मालेगाव यांनी शाकीर खान सलीम खान वय 33 वर्ष राहणार काली बिल्डींग, कामगार कॉलनी, आयशा नगर, मालेगांव याचे विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1)(ब) खालील हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांचे न्यायालयात केला असून त्यांनी आरोपी यास नाशिक, धुळे,जळगांव व नंदुरबार जिल्हयातुन दोन वर्षाकरिता हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.
तर पोलीस निरीक्षक, आझादनगर पोलीस ठाणे, मालेगांव यांनी मोहमद अमीन आरीफ अंजुम ऊर्फ आरीफ पुडी वय 19 वर्ष, रा. नुराणी मशिद जवळ, फतेह मैदान, घर नं.12 मालेगाव याचे विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1)(ब) खालील हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांचे न्यायालयात केला असून त्यांनी आरोपी यास नाशिक, धुळे व जळगांव जिल्हयातुन दोन वर्षाकरिता हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक आयशानगर पोलीस ठाणे, मालेगाव यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार शाकीर खान सलीम खान याच्यावर दाखल चार गुन्ह्यांच्या अनुषंगाने यास नाशिक, धुळे, जळगांव व नंदुरबार या चार जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. तर पोलीस निरीक्षक, आझादनगर पोलीस ठाणे, मालेगांव यांनी मोहमद अमीन आरीफ अंजुम ऊर्फ आरीफ पुडी याच्यावर दाखल सात गुन्ह्यांच्या अनुषंगाने आरोपी यास नाशिक, धुळे व जळगांव जिल्हयातुन दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ.शर्मा यांनी दिली आहे.
हद्दपार व्यक्तीने सदर हद्दपार कालावधीत मुळ वास्तवाच्या ठिकाणी व हद्दपार केलेल्या जिल्हयाच्या भौगोलिक क्षेत्रात उपविभागीय दंडाधिकारी, मालेगांव उपविभाग, मालेगांव यांचे अथवा शासनाच्या लेखी पुर्वपरवानगी शिवाय पुन्हा प्रवेश करु नये. आदेश अंमलात असे पावेतो सदर आरोपी यांनी हद्दपार क्षेत्रा व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात जेथे कोठे रहिवास करीत असेल त्या रहिवासा जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये महिन्यातुन एकदा हजेरी देणे बंधनकारक असेल. तसेच सदर आरोपी हा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाणार असल्यास राज्याबाहेर गेल्यापासुन 10 दिवसाचे आत त्याने त्याच्या जाणेबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना कळविणे बंधनकारक असेल. तसेच राज्याबाहेरुन परत आलेवरही याबाबत त्याने नजीकच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना कळविणे बंधनकारक राहिल. संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सदर हद्दपारीचा आदेश प्राप्त झालेनंतर हद्दपारीत व्यक्तिस हद्दपार क्षेत्रातुन निघुन जाणेबाबतची कार्यवाही 7 दिवसात करुन आरोपीने सदर आदेशाचे अंमलबजावणी करण्याबाबतही उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Tags
crime